IMD Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार, आयएमडीकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी नवा इशारा दिला असून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातलेलं असतानाच आता पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे.
पुढील 24 तास धोकादायक
हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही स्थिती कायम राहू शकते. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येण्याचा धोका वाढला असून, खालच्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 48 तास मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तर मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जालना व बीड जिल्ह्यांना रेड अलर्ट
दरम्यान, जालना जिल्ह्यात पुढील चार ते पाच तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयएमडीकडून करण्यात आलं आहे. यासोबतच बीड जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आला असून, पावसाचा जोर अधिक वाढू शकतो, असा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आधीच मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला होता.
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
या सततच्या पावसामुळे सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन काढणीच्या हंगामात मुसळधार पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात बुडाल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, उडीद, तूर यांसारख्या पिकांवर पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला असून शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.
हा इशारा लक्षात घेता, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करणं आणि सुरक्षिततेस प्राधान्य देणं अत्यावश्यक आहे.