अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2000/- रुपये भाऊबीज भेट, शासन निर्णय (GR) निर्गमित
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी “भाऊबीज भेट” रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

शासन निर्णयाचा पार्श्वभूमी
पूर्वीच्या शासन निर्णय (दि. २३ फेब्रुवारी २०१८) आणि आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर (पत्र क्र. एबाविसेयो/अं.वाडी-भाऊबीज भेट/२०२५-२६/४३७१, दिनांक २१.०८.२०२५) विचार करण्यात आला. या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला.
मंजूर रक्कम
या निर्णयानुसार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी रुपये २,०००/- इतकी भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. ही भेट मानधनाव्यतिरिक्त अतिरिक्त स्वरूपात मिळणार आहे.
निधीची तरतूद
या योजनेसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एक्स-१, २२३६, पोषण आहार, (०८) (०६) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, (भाऊबीज भेट) (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%) (२२३६१९५४), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली तरतूद करण्यात आली आहे.
या अनुषंगाने, एकूण रुपये ४०.६१३० कोटी (अक्षरी रुपये चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार फक्त) इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी संबंधित कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
अशा प्रकारे, महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आर्थिक स्वरूपाचा दिलासा मिळणार असून, त्यांच्या कार्याबद्दलचा गौरव आणि सन्मान अधिक अधोरेखित होणार आहे.