सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! तब्बल १२२ टक्क्यांची वाढ

सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! तब्बल १२२ टक्क्यांची वाढ

सोन्याचे वाढते दर आणि कमी व्याजदर यामुळे लोकांमध्ये एक वेगळाच आर्थिक पर्याय समोर येत आहे. वाढत्या किमतींमुळे लोकांच्या खरेदीशक्तीवर आणि परंपरागत सोन्याच्या दागिन्यांच्या वापरावर मोठा परिणाम होत आहे.

मर्यादित उत्पन्न असलेले कर्जदार तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सूक्ष्म वित्त संस्था (एमएफआय) कडून कर्ज घेण्याऐवजी मोठ्या प्रमाणात सोने तारण ठेवून कर्ज घेण्यास प्राधान्य देत आहेत. जून २०२५ अखेर सोने तारण कर्जात वार्षिक आधारावर तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झालेली दिसते.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे, सोन्याचे दर वाढल्यामुळे आणि सोने तारण कर्जावरील कमी व्याजदरामुळे कर्ज घेण्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. जुलै २०२५ पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची रक्कम २.१४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. ही रक्कम मागील वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी जास्त आहे. याउलट, क्रेडिट कार्ड कर्ज केवळ ६ टक्के वाढून २.११ लाख कोटी रुपये झाले, तर वैयक्तिक कर्ज ८ टक्क्यांनी वाढून १५.३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

महिलांच्या आवडी-निवडींमध्येही बदल दिसून येतो. वाढत्या सोन्याच्या किंमतीमुळे महिला आता जड दागिन्यांपेक्षा हलक्या व फॅन्सी दागिन्यांकडे वळू लागल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे वजन आणि डिझाईनही बदलत आहे.

गुजरात, महाराष्ट्र, तसेच ओडिशासारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये सोने तारण कर्जाची मागणी अधिक वेगाने वाढत आहे.

२०२५ मध्ये सोन्याचा दर तब्बल ४४ टक्क्यांनी वाढून १० ग्रॅम सोने १,२३,८०० रुपयांवर पोहोचले. ३१ डिसेंबर २०२४ रोजी हा दर ८५,८५० रुपये होता. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करेल या अपेक्षेमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सोन्याच्या भावात एका दिवसात तब्बल १,८०० रुपयांची उसळी दिसली.

सोने १,२५,८०० रुपये प्रति १० ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचले असताना, चांदीचाही दर वाढून ३,३२,८७० रुपये प्रति किलो (करांसह) झाला.

तज्ज्ञांच्या मते, सोन्यावर कर्ज घेणे आता कलंक मानले जात नाही. उलट, हा पर्याय व्यवहार्य आर्थिक पद्धत मानला जातो. त्यामुळे सोने तारण कर्ज घेण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

तीनपेक्षा जास्त कर्जदाते असलेल्या कर्जदारांची संख्या जून २०२५ पर्यंत ५.७ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर आली आहे. कठोर नियमांमुळे अनेकांना दागिने तारण ठेवावे लागत आहेत.

Leave a Comment