Maharashtra Local Body Election 2025 : दिवाळीनंतर निवडणुकीचा बार फुटणार!
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दिवाळीनंतर निवडणुकीचा बार फुटणार असून याबाबत राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक नियोजन सुरू केले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.
निवडणुकीसाठी तीन टप्प्यांचे नियोजन
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार असून यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नोव्हेंबरपासून निवडणुकीची सुरुवात
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे जानेवारी 2026 मध्ये मुंबईसह राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील, असा अंदाज आहे.
पक्षांची तयारी वेगात
निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, त्यामुळे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक स्तरावर सभा, मेळावे, जनसंपर्क मोहीमा आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे.