मोठी बातमी : राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर

राज्यभरातील शाळांसाठी शिक्षण विभागाने वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालणार असल्याने पालक व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे.

दरवर्षी शाळांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा पूर्ण होतात. १५ एप्रिलपर्यंत परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांना निकाल तयार करण्यासाठी वेळ मिळतो आणि १ मे रोजी निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा परीक्षा उशिरा घेतल्याने शिक्षकांना कमी वेळ मिळणार आहे, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतील.

राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले की, परीक्षा वेळापत्रकामुळे पालक आणि शिक्षक अस्वस्थ आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत मुलांना परीक्षा द्यावी लागेल, त्यामुळे त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, अनेक कुटुंबे एप्रिल अखेरीस बाहेरगावी जातात, तसेच ग्रामीण भागात यात्रांचे नियोजन असते, त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती राखणे कठीण होईल.

या परीक्षांमध्ये ३ री ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन २ व पॅट चाचणी देखील घेतली जाणार आहे. पॅट परीक्षा मराठी, इंग्रजी व गणित विषयांसाठी असते. शिक्षकांना परीक्षा संपल्यानंतर तातडीने उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करावा लागेल, मात्र त्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही.

शिक्षक संघाच्या मते, सरकारने फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ देण्याऐवजी त्यांना प्रशिक्षणासाठी गुंतवले. तसेच, एप्रिलमध्ये परीक्षा आयोजित करून उन्हाळ्यात शिक्षक व विद्यार्थ्यांना त्रास होईल असे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षक संघाने सरकारला वेळापत्रक बदलण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment