पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज ! १ ऑक्टोबरपासून नियम बदलणार
सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीच्या बचतीला अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनविण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. या बदलामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२५ पासून नवे नियम लागू होणार आहेत. या नियमानुसार, खासगी क्षेत्रातील NPS सबस्क्रायबरना आता आपल्या पेन्शन फंडातील १००% रक्कम इक्विटीमध्ये म्हणजेच शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवण्याची मुभा मिळणार आहे.
याआधी NPS सबस्क्रायबरना जास्तीत जास्त ७५% पर्यंतच रक्कम इक्विटीमध्ये गुंतवण्याची परवानगी होती. पण आता ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली निवृत्ती बचत पूर्णपणे शेअर बाजाराशी निगडित योजनांमध्ये गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
या बदलामुळे निवृत्ती बचतीवरील परतावा वाढण्याची शक्यता असून, कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी अधिक लवचिकता मिळेल. मात्र, पूर्ण रक्कम शेअर बाजारात गुंतवताना जोखीम देखील तितकीच वाढणार असल्याने सबस्क्रायबरनी काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.